top of page

ADHYAKSHIY

II श्री II 

 

नमस्कार मंडळी 

 शिकागो मराठी शाळेची संस्थापिका आणि संचालिका  म्हणून हा पहिला त्रैमासिक  आढावा घेताना मला खूप आनंद होत आहे . मला ही संधी दिली ती उत्तर अमेरिकेतल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाने. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य श्री. नितीन जोशी यांच्या सहकार्याने आम्ही ह्या प्रकल्पाची सुरुवात केली . शिकागो मराठी विद्यामंदिराचे उद्घाटन दिनांक १२ ऑक्टोबर २०१४ रोजी Eola community center येथे झाले. शाळेच्या उद्घाटनप्रसंगी शिकागो महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. केदार नावकल,  सौ. सुचेता अकोलकर, डॉ. उषाताई महिसेकर आदी मान्यवर उपस्थित होते. ह्या उपक्रमाला सौ. शिल्पा नाईक, सौ. शुभांगी सुमंत, सौ. भारती वेलणकर , सौ. आश्विनी मोडक, सौ. मनीषा रहाटाडकर, सौ.मानसी जोशी ,सौ. वर्षा विसाळ, सौ. स्मिता बेन्नूर, सौ. अनुराधा राजाध्यक्ष, सौ. आरती जोशी, श्री. मंदार य. जोगळेकर, सौ. कोमल पित्रे व सौ. प्रियांका सोनावणे अशा अनेक  स्वयंसेवकांचा मोलाचा हातभार लागला आहे. तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे सौ. सुनंदा टुमणे, सौ. सोना भिडे ,सौ. नमिता दांडेकर यांनी शिकागोत शाळा सुरु करण्यासाठी मोलाची मदत केली आहे .

 

शाळेचा अभ्यासक्रम भारती विद्यापीठ, पुणे ह्या  मान्यवर शिक्षण संस्थेने आखलेला आहे.  ही मराठी शाळा शिकागो मध्ये Schaumburg आणि Naperville ह्या दोन ठिकाणी भरते. ह्या दोन्ही ठिकाणच्या शाळेमध्ये  एकूण ७० विद्यार्थी शिकतात.  वयोगट ४ १/२ ते ९ वर्षे व ९ ते १२ वर्षे ह्या दोन वयोगटात विद्यार्थी विभागले आहेत.  शाळेचा अभ्यासक्रम हा अनिवासी मराठी माणासांच्या आजच्या काळाच्या गरजा लक्षात ठेवून तयार केलेला आहे.

 

 आज जगभरात सर्वत्र व विशेष करून उत्तर अमेरिकेत अनेक मराठी माणसे आहेत. किबहुना महाराष्ट्राबाहेर मराठी भाषिक सर्वात ज्यास्त संख्येने उत्तर अमेरिकेतच आहेत.  त्या मराठी माणासांच्या मनात बऱ्याचदा आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेची ओळख कशी होईल व आपल्या मुलांवर मराठी संस्कार कसे होतील असे प्रश्न आहेत . त्यांच्या ह्या गरजा विचारात घेऊन भारती विद्यापीठ व बृहन्महाराष्ट्र मंडळ ह्यांनी ह्या मराठी शाळेचा अभ्यासक्रम बऱ्याच संशोधनानंतर तयार केला आहे.

 

आपल्या मराठी भाषेमध्ये मराठी संतांनी, इतिहासकारांनी, लेखक व लेखिकांनी, कवी व कवयित्रींनी खूप मौल्यवान व दर्जेदार साहित्याची निर्मिती केली आहे . हे साहित्य  वाचल्याने, समजावून घेतल्याने व आचरणात आणल्याने आपल्या  नवीन पिढीला त्यांच्या  वैयक्तिक व व्यावसायिक कर्तृत्वाला एक प्रकारचा उजाळा मिळेल अशी अपेक्षा  ठेवून त्यांना आपल्या मातृभाषेची ओळख व्हावी अशा उद्देशाने ही मराठी शाळा उत्तर अमेरिकेत शिकागो येथे सुरु झाली आहे.

 

शिकागो मराठी विद्यामंदिर त्यांना मराठी वाचायला, लिहायला व बोलायला शिकवेल आणि विद्यार्थ्यांना बृहन्महाराष्ट्र मराठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी परीक्षेला बसण्याची संधी पण देण्यात येईल. ह्या शाळेच्या अभ्यासक्रमाच्या ५ श्रेणी आहेत. (मुलभूत, मध्यस्थ ते प्रगत). प्रत्येक मुलगा वा मुलगी हे त्यांच्या क्षमते नुसार शिकणार आहेत व कोणाही विद्यार्थ्याला कुठलीही श्रेणी गाठण्याचे वेळेचे बंधन नाही. पाल्यांच्या  तयारी नुसार त्यांना वरच्या श्रेणी मध्ये जाण्यासाठी परीक्षेला बसण्याची संधी ह्या शाळेतर्फे देण्यात येईल.  मराठी श्लोक, कविता व चित्रकला पण ह्या शाळेत शिकविली जाईल. प्रत्येक आठवड्याच्या रविवारी ही शाळा भरते. शाळेची वेळ  १ १/२ तास आहे. सप्टेंबर ते डिसेंबर व जानेवारी ते मार्च अशा दोन सहामाही भागात शाळेचा अभ्यासक्रम विभागला आहे. शाळेच्या या उपक्रमाला आम्हाला  शिकागोवासियांनी भरघोस प्रतिसाद आणि पाठींबा  दिला आहे त्याबद्दल मी सर्वांची अतिशय ऋणी आहे. असेच प्रोत्साहन  मिळून शाळेची उत्तोरत्तर प्रगती व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

 

धन्यवाद, 

सौ. विद्या जोशी 

संचालिका, शिकागो मराठी विद्यामंदिर 

bottom of page